पेपर, टीव्हीवर त्याचा नव्हता गाजावाजा
पण एकोप्याने नांदत होता पूर्वी
गाव माझा
तेव्हा सुख दुःख दुसऱ्यांच, हाल-हवाल कळे
गावात कुणी वारल की सारा गाव
हळहळे
खेळत असत लहान मोती मुल मैदानी
खेळ
मुलांसारखा खुशीत जायचा मोठ्यांचाही
वेळ
लग्न, तेरावी, आजारपणात कुणाचं
न अडे काम
अडल्या नडल्यास उसना मिळे पै-पैसा,
दाम
न सांगताच दुसर्यांची गरज कळत
असे
कार्य प्रसंगात तरुण वर्ग धावत
पळत असे
जरी जाती धर्मांचे उभे होते वेगवेगळे
स्तंभ
एकोप्याने साजरे व्हायचे सण-समारंभ
सांज-सकाळी देवळांमध्ये आरती
रोज व्हायची
छोटी-मोठी निवडणूकही 'अनअपोज'
व्हायची !
दुष्काळातही माणुसकीच नातं जपलं
जायचं
गरजूंना कुणी धन, धान्य कुणी
द्यायचं
मोबाईलच्या जमान्यात कालबाह्य
तार-पत्र ....
काळानुसार बदलत गेलं माझ्या गावाचं
चित्र !
प्रकाश बनसोड यांची ही कविता पेपर मध्ये वाचली आणि गावाच्या सर्व जुन्या आठवणी जाग्या झाल्या.
आमचे गाव पण असेच होते. डोंगराच्या कुशीत वसलेले. गावाच्या जवळच उरमोडी नदी होती आणि गावाच्यामागे आंब्या-जांभळाची झाडे आणि आमच्या घरासमोर आमचे अंगण म्हणजे आमचे शेत होते. त्यावर आम्ही खूप खेळायचो आणि आमच्याबरोबर खेळण्यासाठी चुलत चुलते, आत्या होत्या. ते सर्वजण आमच्यापेक्षा थोडेच मोठे होते. शनिवार-रविवार मी आणि माझी मोठी बहिण गावाला जायचो खूप धमाल करायचो. सर्वजण मिळून अंगणात लपाछपी, आंधळी कोशिंबीर, पकडापकडी असे बरेच खेळ खेळायचो. मे महिन्यात तर खूप मजा यायची. सर्वाना सुट्ट्या असल्यामुळे सर्वजण एकत्र यायचे. काका-काकू, मामा-मामी, आत्या आणि सर्व भावंडे एकत्र यायचो. दिवसभर खेळायचे, आंबे-जांभळे आणण्यासाठी जाणे, नदीवर पोहायला जाणे आणि रात्री बैठे खेळ खेळणे. दिवस कसा जायचा कळायचे देखील नाही. अश्या खूप आठवणी आहेत ज्या शब्दात सांगणे कठीण आहे. आमच्या गावाचे पुनर्वसन झाले आणि उरमोडी नदी धरणामध्ये रूपांतरित झाली. सर्व काही बदललेले, नवीन गावी ना डोंगर, ना नदी, फक्त उनाड माळ रान.
आठवणी ह्या अश्या का असतात?
ओंजळ भरलेल्या पाण्यासारख्या
नकळत ओंजळ रिकामी होते,
आणि मागे उरतो फक्त ओलावा
प्रत्येक आठवणींचा !!!!
No comments:
Post a Comment